खरोखर कोरोना जग बदलेल का?

कोरोना विषाणू सध्या जगभर कत्तल घडवत आहे. भारतही आता धोकादायक पातळीवर पोहचलाय.

मेघा कुचिक | Updated: Apr 1, 2020, 12:36 PM IST
खरोखर कोरोना जग बदलेल का? title=

मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई  :  कोरोना विषाणू सध्या जगभर कत्तल घडवत आहे. भारतही आता धोकादायक पातळीवर पोहचलाय. भारतात काय होईल हे आत्ताच सांगता येणार नाही. मात्र भविष्यात कोरोनामुळे जग नक्कीच बदललेलं असेल. अनेकांनी आपले प्रियजन गमावलेले असतील. आधीच जागतिक अर्थव्यवस्था डगमगलेली आहे आणि कोरोनाच्या संकटानंतर तर जागतिक अर्थव्यवस्थाच कदाचित उध्वस्त होईल. 

लोकांच्या नोकऱ्या जातील. गरीब लोक उपाशीपोटीही मरू शकतात. जगातला पर्यटन व्यवसाय किमान काही वर्षे ठप्प होईल. ज्या पर्यटनावर अनेक युरोपियन देशांची अर्थव्यवस्था अवलंबून आहे ते देश तर आर्थिकदृष्ट्या कोलमडूनच पडतील. चीनचं महासत्ता बनण्याचं स्वप्न बहुदा उध्वस्त होईल. 

भारतासह अनेक देशात चिनी वस्तूंची मागणी कमी होईल. चीन देशाकडे आणि  चिनी नागरिकांकडे इतर देश आणि इतर देशातील लोक कदाचित आरोपीच्या नजरेतून पाहतील. चीन कदाचित एकटं पडेल. कोरोनामुळे जागतिक क्रीडा क्षेत्रावरही याचा परिणाम नक्कीच पाहायला मिळेल. 

कोरोनाचा कहर कमी झाल्यावर अमेरिका आणि इतर प्रगत, पॉवरफूल देश चीनला खडे बोल सुनावल्याशिवाय राहणार नाहीत. हा खरंच विषाणू नकळत मानवी शरीरात घुसला की खरंच काही विषाणूजन्य शस्त्र चीन किंवा अमेरिका बनवत आहे यावरही भरपूर चर्चा झडतील. 

खरं जगासमोर येईल किंवा नाही माहीत नाही. मात्र भविष्यात अशाप्रकारचं संकट जर मानवावर आलं तर त्याला सामोर जाण्यासाठी आता सारीच प्रगत राष्ट्र तयारीला लागतील. या विषाणूनं मानवाच्या क्षमतेलाच आव्हान दिलं आहे. मग जगभरातील शास्त्रज्ञ झटून दिवस रात्र एक करून अशा संकटांवर मात करण्यासाठी कामाला लागतील. 

हा विषाणू जागतिक अर्थव्यवस्था बदलेल, हा विषाणू जगाचं भविष्य बदलेल, हा विषाणू जागतिक राजकारण बदलेल, हा विषाणू मानवाची जीवनशैली बदलेल आणि हा विषाणू मानव जातीला इथूनपुढे अशा संकटाचा मुकाबला कसा करायचा असतो हे देखील शिकवून जाईल.