यंदा वटपौर्णिमेला करा पर्यावरणाचंही व्रत!

यंदा वटपोर्णिमेसोबत आणखी एक व्रत करण्याचं सकल्प आपण करु शकतो का?

Updated: Jun 5, 2020, 10:39 AM IST
यंदा वटपौर्णिमेला करा पर्यावरणाचंही व्रत! title=

आरती शिंदे, नवी दिल्ली : अख्ख्या जगभरात पसरलेले 'कोरोना संकट', नुकतंच येऊन गेलेलं 'निसर्ग चक्रीवादळ' आणि आता नासा या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थने दिलेल्या इशाऱ्यानुसार, ६ जूनला पृथ्वीच्या जवळून जाणाऱ्या  '१६३३४८ (२००२ एनएच फोर) नावाच्या लघुग्रहाचं अस्मानी संकट'..... सध्या अशा स्वरुपाच्या कधी निसर्गनिर्मित तर कधी मानवनिर्मित संकटांतून, जीवन-मरणाच्या संघर्षातून पृथ्वीतलावरील प्रत्येक लहान-मोठा सजीव जात आहे. कोणतंही नैसर्गिक संकट आलं तर ते शमवणं किंवा थांबवणं केव्हाही मनुष्याच्या हातात नसतं. कारण ते ज्या विध्वंसक प्रवृत्तीने धडकतं तो वेग, तो जोर, तो दाब नियंत्रित करणं अजून तरी मानवनिर्मित तंत्रज्ञानाच्या पकडीत आलेलं नाही. निसर्गाचा हा सारा खेळ थांबण्याची वाट आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहत राहतो. आणि त्यानंतर पुन्हा जगण्याच्या उत्कट प्ररणेने भौतिक सुखांनी सजवलेला तो संसार त्याच उत्स्फूर्त मानवी भावनेने आपण एकवटायला लागतो. यालाच का ते 'जीवनचक्र- निसर्गचक्र' म्हणतात?! 

आणि खरंच जर हे निसर्गचक्र असेल तर निर्सगाने निर्माण केलेल्या या चक्रात प्रत्येक सूक्ष्मजीव, सजीवांबरोबर जगत असताना त्यांच्यापेक्षा जरा जास्त बुद्धीमान म्हणून, एक मानव म्हणून आपली जबाबदारी काय असावी...?; जी पूर्ण न झाल्यानेच कदाचित हा 'निसर्ग' नावाचा निर्माता आपल्यावर कोपत तर नाही ना? याचा विचार करण्याची वेळ आलीय, असं म्हणणं आताशा योग्य ठरणार नाही. कारण, खरंतर ती वेळ कधीच येऊन गेलीय.  आता वेळ आहे, त्या जबाबदारीचं, निसर्गाप्रती त्या कर्तव्याचं पालन करण्याची! यासाठी आजच्या जागतिक पर्यावरण दिनाचं निमित्त साधून आजचाच मुहूर्त शुभ मानुयात, मग! आजचा दिवस एक उत्तम योगायोगाचाच दिवस म्हणुयात खरंतर! कारण भारतातील, विशेषतः महाराष्ट्रातील स्त्रिया आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी, त्याच्या साताजन्मींच्या साथीसाठी जो व्रताचा दिवस सण म्हणून साजरा करतात ती 'वटपौर्णिमा' आणि 'जागतिक पर्यावरण दिन' दोन्ही एकाच दिवशी आले आहेत. स्त्रिया पर्यावरणाच्या सान्निध्यात, त्या निसर्गाच्याच साक्षीने या वटपौर्णिमेच्या व्रताची पूजा करतात. वडाच्या झाडाभोवती त्या सात फेऱ्या (सात जन्मांचे प्रतिक) मारत बंधन म्हणून एक धागा गुंडाळतात. मनोमनी पतीच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतात. हा व्रताचा वसा पुराणातल्या ज्या सावित्रीकडून आजच्या आधुनिक युगातल्या स्त्रीपर्यंत चालत आलेला आहे, त्यात काळानुरूप, सोयीनुरूप खरंतर यथाशक्ती बरेच बदल झाले आहेत. 

Image preview

अनेकांना ज्ञात असलेली वटपौर्णिमेच्या व्रताविषयीची पुराणातील जी आख्यायिका आहे ती काहीशी अशी... भद्र नावाच्या एक देशात अश्वपती नामक राजाचे राज्य होते. त्या राजाची एक राजकन्या. तिचं नाव सावित्री. ती अतिशय सुंदर, देखणी आणि हुशारही. सावित्री (उपवर) लग्नाच्या वयाची झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने शाल्व राज्याचा अंध राजा धृमत्सेन याचा मुलगा, राजकुमार सत्यवान याच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. सत्यवान राजकुमार असला तरी वडिल धृमत्सेन शत्रूकडून हरल्यामुळे राज्य गमावून बसल्याने त्याचं कुटुंब जंगलात वास्तव्याला होतं. दारिद्र्यात जगणाऱ्या सत्यवानाला कमी आयुष्याचाही शाप होता जणू. सत्यवानाचं आयुष्य केवळ एक वर्षाचंच असल्याचं नारदमुनींना माहीत होतं. म्हणूनच सत्यवानाशी लग्न न करण्याचा सल्ला त्यांनी सावित्रीला दिला. सावित्रीने मात्र तो अमान्य करून सत्यवानाशीच विवाह केला. पुढे ती जंगलातच नवरा-सासूसासरे यांच्यासोबत राहू लागली. सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसांवर येऊन ठेपला तेव्हा तिने त्याच्या दिर्घायुष्यासाठी सलग तीन दिवस उपाशी राहून मनोभावे व्रत केले . तिसऱ्या दिवशी सत्यवान जंगलात लाकडं तोडायला निघाला तेव्हा सावित्रीही त्याच्या सोबत जाऊ लागली. लाकडं तोडत असताना अचानक सत्यवानाला भोवळ आली आणि तो जमिनीवर पडला. त्याचवेळी यम तिथं आला आणि सत्यवानाचे प्राण नेऊ लागला.  त्याक्षणी सावित्रीही यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेकदा सावित्रीला परत जाण्यास सांगितलं. पण तिने नकार दिला. ती पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरून बसली. अखेर कंटाळून यमाने तिला पती सोडून इतर तीन वर मागण्यास सांगितले. सावित्री हुशार होतीच. तिने फार विचार करून सासऱ्यांची दृष्टी आणि गेलेले राज्य परत मिळावे हे दोन वर मागितले. तिसरा वर यमालाच पेचात पाडणारा ठरला. ती म्हणाली, आम्हाला पुत्र व्हावा असा तिसरा वर दे. यमाने गफलतीने तथास्तु म्हटलं. तेव्हा आपण वचनात अडकल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानुसार सत्यवानाचे प्राणही यमाला परत करावे लागले. हा प्रसंग वडाच्या झाडाखालीच घडल्याचं सांगितलं जातं. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून तिथीनुसार, ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी आणि सात जन्मांच्या सोबतीसाठी उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात. 

पुराणापासून 'पतिव्रता' म्हणून जीचा महिमा गायिला जातो;  इतकंच काय, आध्यात्मिक संकल्पनेतून जिच्यावर योगी अरविंद यांनी 'सावित्री' नावाचं महाकाव्यही लिहिलेलं आहे, अशा सावित्रीचं आजच्या काळातील स्त्रीशी यत्किंचितही साम्य नाही,  असंही म्हणता येणार नाही. कारण आजची ही आधुनिक स्त्री केवळ संसारच सांभाळत नाहीए, तर तो संसार सक्षमपणे उभा राहावा यासाठी नवऱ्याच्या बरोबरीने कमावतीही झाली आहे. तिच्या साथीनं नक्कीच नवऱ्याची घरासाठीच्या अर्थार्थाची काळजी आणि तो भारही काहिसा कमी झालेला आहे. थोडक्यात, तिनं त्याला उसंतीचे काही क्षणच दिल्यासारखे नाही का? जे अनेकार्थाने त्याचं आयुष्य वाढवणारेही आहेत. अशाही अनेक स्त्रिया आहेत, ज्या कमावत नसल्या तरी काटकसरीच्या स्त्री स्वभावाने नवऱ्याचा संसार समर्थपणे पेलत आहेत. प्रत्यक्षपणे ती हातभार लावत नसली तरी अप्रत्यक्षपणे नवऱ्याच्या जबाबदारीतील तिचा वाटा अनमोलच म्हणावा लागेल. जगण्याच्या या साऱ्या सोपस्कारांमध्ये नवऱ्याविषयीचं तिचं प्रेम, आदर, मैत्रिपूर्ण संबंध अधिक उघडपणे व्यक्त करण्यासाठी 'वटपौर्णिमेचं' निमित्त तिला आजही खुणावत असेल तर त्यात गैर काहीच नाही.  

Image preview

आधुनिक युगातली ही स्त्री नवऱ्यासाठी तीन दिवस नाही पण एक दिवस उपवास करते, तिचा हेल्थ कॉन्शिअसनेस तिला उपवासाचे पदार्थ खायलाही भाग पाडतो. सणांच्या आडून आपल्या व्यक्तिसाठी नटणं, सजणं कोणत्याही स्त्रीला आवडतंच. तशी ती पूजा करण्यापूर्वी छान नटतेही. वटपौर्णिमा साजरीकरण्याचे तिचे संदर्भ मात्र बदलत्या काळानुसार बदलले आहेत. वडाच्या झाडापाशी जाऊन त्याला पुजण्याऐवजी कालांतराने फांदीच्या रुपात ते घरातच आणून ती पुजू लागली. आता तर व्हर्च्युअल जमान्यात तिने ऑनस्क्रिनच ही पूजा करण्याचं ठरवलंय. सध्याचं कोरोनाचं संकट पाहता, लॉकडाऊनमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा नियम मोडला जाऊ नये, म्हणून तिने घराबाहेर न पडता वटपौर्णिमेची पूजा करण्याचा हा एक मार्गही शोधून काढलाच. लॉकडाऊनमुळे वडाची फांदी, वाण आणायलाही घराबाहेर पडू शकत नसल्याने प्रतिकात्मक म्हणून कम्प्युटरच्या स्क्रिनवर वडाचा फोटो ठेवून किंवा कागदावर वडाचं चित्र काढून किंवा अगदी दारात रांगोळीनं वडाचं चित्र काढून पुजणार असल्याच्या प्रतिक्रीया सोशल मीडियावर आज अनेकींनी व्यक्त केल्या आहेत. काळानुरूप बदलणारा हा तार्किक विचार स्वागतार्ह म्हणुयात... कारण आतापर्यंत या पुजेसाठी छोट्या स्वरुपातील का होईना पण झालेली वृक्षतोड कुठेतरी थांबणार आहे. 

त्याही पुढे जाऊन या 'सावित्रीव्रता'शी जोडणारा 'निसर्गसान्निध्याचा' एक धागा कायम राहवा यासाठी, आणखी एक नवं व्रत अंगिकारणं ही देखील आपण काळाची गरज मानली पाहिजे. पर्यावरण दिनाचं निमित्त यंदा आहेच. या पर्यावरण दिनी निसर्गाशी जोडलेल्या या व्रताबरोबरच निर्सगाच्या संवर्धनाचे व्रतही स्विकारुयात. आतापर्यंत स्त्री वटपौर्णिमेचं व्रत एकटीच करत आलीय. ज्या नवऱ्यासाठी ती हे व्रत करत आलीय, त्याचा प्रत्यक्ष सहभाग या सणात कधीच नसायचा. मात्र आता प्रत्येक पुरूषानंही हा सण तितकाच आपलासा करून घ्यायला हवा. यंदा लॉकडाऊनमुळे बरीच पुरूषमंडळी घरीच असल्याने अनेकींना आपल्या पतीची सोबत असणारच आहे. मनोमनी त्याच्या दिर्घायुष्याची कामना करताना  त्याच्यासोबतीनेच एखादं रोप नक्की लावालं पाहिजे. त्यासाठी कुंडी जरी लहान असली तरी दोघा उभयतांच्या स्पर्शाने रुजवलेलं ते रोप वाढताना भविष्यात तुमच्यात फुलणाऱ्या प्रेमाचाही साक्षीदार ठरणार आहे. यातून केवळ वटपौर्णिमाच नाही तर निसर्गाप्रती असलेल्या जबाबदारीच्या जाणिवेतून पर्यावरण दिनही नटलेल्या सजलेल्या चेहऱ्यांनी साजरा होईल, हे नक्की! 
 
सावित्रीचं प्रेम आणि सत्यवानाला जगविण्याची इच्छा इतकी उत्कट होती की, यमालाही सत्यवानाला पुन्हा जीवनदान द्यावं लागलं होतं. या पवित्र कथेचं वलय असलेल्या वटपौर्णिमा व्रताचा स्वीकार करताना आपल्या स्वकीयांच्या उत्तम आरोग्याबरोबरच निसर्ग संरक्षण-संवर्धनाची जबाबदारी अशा दुहेरी भूमिकेतून याकडे पाहिलं गेलं पाहिजे. जो निसर्ग अलीकडे कधी पूर, कधी दुष्काळ, कधी चक्रीवादळ, कधी भूस्खलन, कधी भूकंप यांसारख्या संकटांतून आपल्यापुढे उभा ठाकतोय, तो त्या यमाहून काही वेगळा नाही. सत्यवानाला मिळालेलं जीवनदान आपल्यालाही मिळवायचं असेल तर सावित्रीच्या हुशारीनेच वागावं लागेल. निसर्गानं आपल्यावर मायेचा हात फिरवावा असं वाटत असेल तर त्याआधी निसर्गाचा हात हातात घ्यायला हवा. जगण्याचा प्रत्येकच दिवस आता पर्यावरण दिन म्हणूनच साजरा व्हायला हवा. केवळ या दिवशीच आतापर्यंत मोठ्या प्रमाणात झाडे लावूनच आपण पर्यावरण संवर्धनाला हातभार लावत आलोय, मात्र हा विचार आता पुरेसा नाही. तर वृक्षतोड थांबविणं, मानवनिर्मित कचऱ्याचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन, ई-कचऱ्याचे व्यवस्थापन, पावसाच्या पाण्याची साठवण (रेन-वॉटर हार्वेस्टिंग), निसर्गचक्रातील इतर प्राणीपक्षी, सजीवांचे जतन-संवर्धन यांसारख्या इतर उपाययोजनांचेही मोठ्या प्रमाणात नियोजन केले गेले पाहिजे.

हा ब्लॉग कसा वाटला. आपली प्रतिक्रिया खालील दिलेल्या इमेलवर नक्की कळवा.      
aarti.shinde1512@gmail.com