मराठीतील पहिलं साल्सा सॉंग "शनाया" प्रेक्षकांच्या भेटीला

हरिश वांगीकर याने या गीताची निर्मिती केली आहे.  भारती न्यायाधीश यांनी हे गाणे लिहिले असून 5संगीतकार पिनाक न्यायाधीश याने ते संगीतबद्ध केले आहे.

Updated: May 13, 2024, 12:40 PM IST
मराठीतील पहिलं साल्सा सॉंग "शनाया" प्रेक्षकांच्या भेटीला title=

मुंबई : आत्तापर्यंत मराठीत वेग-वेगळे प्रयोग केले गेले आहेत. वेग-वेगळ्या प्रकारच्या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. गुलाबी साडी, नखरेवाली, अशा गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्यानंतर आता मराठीत नवा आणि आगळावेगळ्या प्रयोग केला जाणार आहे. 

अमेरिका, युरोपीय देशात 'साल्सा सॉंग' हा  गीतप्रकार चांगलाच लोकप्रिय आहे. गाण्याचे बोल आणि गीत - संगीताच्या तालावर एका विशिष्ट पध्दतीने जोडीने करावयाचा हा नृत्याविष्कार आता मराठीमध्ये ऐकायला तसेच पहायला उपलब्ध करुन देण्यात आला आहे. 

पुण्यातील युवा गायक हरिश वांगीकर याने या गीताची निर्मिती केली आहे.  भारती न्यायाधीश यांनी हे गाणे लिहिले असून युवा संगीतकार पिनाक न्यायाधीश याने ते संगीतबद्ध केले आहे." हस ना जरा  शनाया " हे त्या गाण्याचे बोल असून हरिशने  प्राजक्ता पाटील हिच्यासोबत या गाण्याच्या व्हिडिओमध्ये नृत्याभिनयही केला आहे. 

तारुण्यातील मैत्री, मैत्रीचे प्रेमात रूपांतर, एकमेकांबद्दचे आकर्षण, रुसवे, फुगवे, मिलनाची आस अशा विविध भावभावनांची गुंफण भारती न्यायाधीश यांनी या गाण्यात केली आहे.  गीतातील हळुवार शब्दांना अतिशय तरल, भावस्पर्शी आणि ठेका धरायला लावणारे संगीत पिनाक न्यायाधीश याने दिले आहे. हरिश वांगीकर याने शब्दातील भावभावना आणि संगीताचा एकंदरीत बाज लक्षात घेऊन समरसतेने हे गाणे गायले आहे. गीतातील शब्द, त्याला लाभलेले संगीत,  गायनाची शैली आणि नृत्याविष्कार पहाता  " शनाया " हे मराठीतील पहिले साल्सा सॉंग असल्याचा दावा गायक आणि निर्माता या नात्याने हरिश वांगीकर याने केला आहे. 

आदेशप्रतापसिंह चौव्हाण यांनी या गाण्याची कोरीओग्राफी केली असून त्याचे दिग्दर्शन प्रमोदकुमार बारी यांनी केले आहे. वेशभूषा समृध्दी वाळवेकर तर मेकअपची जबाबदारी स्नेहा धोंगडी हिने पार पाडली आहे. विशेष म्हणजे गायक हरिश वांगीकर आणि संगीतकार पिनाक न्यायाधीश हे दोघे आय टी क्षेत्रात कॉम्प्युटर इंजिनियर म्हणून कार्यरत असून गीत - संगीताच्या माध्यमातून ते कलेची जोपासना करीत आहेत.