बिहारमध्ये महाआघाडीचं जागावाटप जवळपास निश्चित

काँग्रेस आणि राजदमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्यूला लवकरच जाहीर होणार

Updated: Mar 14, 2019, 02:04 PM IST
बिहारमध्ये महाआघाडीचं जागावाटप जवळपास निश्चित title=

पटना : बिहारच्या महाआघाडीचं जागावाटप जवळपास निश्चित झालं आहे. बिहारमध्ये काँग्रेस ११ जागांवर निवडणुका लढवणार आहे. पण डाव्या पक्षांना सोबत घ्यायचं की नाही याबाबत अजून कोणताच निर्णय झालेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरच जागा वाटपाची घोषणा केली जावू शकते. राजद आणि काँग्रेस नेत्यांमध्ये दिल्लीमध्ये बुधवारी रात्री बैठक झाली. ही बैठक बराच वेळ चालली. असहमती असलेल्या अनेक जागांबाबत या बैठकीत निर्णय झाल्याचं कळतं आहे.

काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने 'पीटीआय' सांगितलं की, 'बैठकीत जागावाटप जवळपास निश्चित झालं आहे. राजदकडून काँग्रेसला ११ जागा देण्याचं मान्य झालं आहे. महाआघाडीमध्ये सगळ्या पक्षांना सन्मान मिळेल. 17 मार्चला महाआघाडीची घोषणा होऊ शकते.

सूत्रांच्या माहितीनुसार, राजद नेते तेजस्वी यादव रालोसपा, हिंदुस्तान आवाम मोर्चा, लोकतांत्रिक जनता दल आणि मुकेश साहनी यांच्या विकासशील इन्सान पार्टी यांना महाआघाडीत घेऊ इच्छित आहेत. राज्यात डाव्या पक्षांना सोबत घेण्यात मात्र ते इच्छूक नाहीत. दुसरीकडे काँग्रेसला डाव्या पक्षाला सोबत घेऊन १ ते २ जागा देण्याच्या विचार करत आहे.
 
बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा आहेत. २०१४ मध्ये भाजपने येथे २२ जागा जिंकल्या होत्या. लोक जनशक्ती पक्षाने ६ जागा जिंकल्या होत्या. राजदला मात्र फक्त ४ जागा मिळाल्या होत्या. जदयूने २ तर काँग्रेसने २ जागा जिंकल्या होत्या. बिहार विधानसभेतील काँग्रेसचे नेते सदानंद सिंह यांनी म्हटलं की, 'राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस मजबूत झाली आहे. जर जागांचा तिढा नाही सुटला तरी काँग्रेसला काहीही फरक पडणार नाही. आम्ही कोणाला ही बांधील नाही.'