लाखोंच्या पगाराची ITची नोकरी सोडली, आण्णा आंदोलनाने दिली ओळख;कोण आहे स्वाती मालीवाल?

Swati Maliwal Details: स्वाती मालीवाल कोण आहेत? याबद्दल जाणून घेऊया. 

Pravin Dabholkar | Updated: May 18, 2024, 04:38 PM IST
लाखोंच्या पगाराची ITची नोकरी सोडली, आण्णा आंदोलनाने दिली ओळख;कोण आहे स्वाती मालीवाल? title=
swati maliwal

Swati Maliwal Details: सध्या स्वाती मालीवाल हे नाव देशभरात चर्चेत आहे. आम आदमी पार्टीच्या बड्या नेत्यांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. त्या राज्यसभा खासदारदेखील आहेत. स्वाती मालीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि त्यांचे पीए विभव कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानी विभव कुमार यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप स्वाती मालीवाल यांनी केला. या घटनेनंतर एफआयआर दाखल करण्यात आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी विभव कुमार यांना ताब्यात घेतलं. या घटनेवरुन मोठं राजकारण सुरु आहे.  दरम्यान स्वाती मालीवाल कोण आहेत? याबद्दल जाणून घेऊया. 

यूपीच्या गाझियाबादचा जन्म

स्वाती मालीवाल यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1984 रोजी उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये झाला होता. त्यांचे वडील अशोक मालीवाल भारतीय सैन्यात एक बडे अधिकारी होते. त्यांच्या आईचे नाव संगीता मालीवाल आहे. 

वडिलांच्या हातून घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागायचा, याबद्दल स्वाती यांनी आधी सांगितले आहे. यामुळे त्या त्रस्त असायच्या. त्यांनी आपले शिक्षण एमिटी आंतरराष्ट्रीय शाळेतून पूर्ण केले.  तर जेएसएस अकादमी ऑफ टेक्निकल एज्युकेशनमधून त्यांनी इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीमध्ये पदवी मिळवली आहे.  

जनसेवेसाठी सोडली लाखोंच्या पगाराची नोकरी 

22 वर्षांची असताना स्वाती मालीवाल यांच्याकडे लाखोंचे पॅकेज असलेला आयटीचा जॉब होता. एचसीएस कंपनीच चांगल्या पदावर त्या कार्यरत होत्या. पण त्यांनी ती नोकरी सोडली. झोपडपट्टीमध्ये गरीबीत राहणाऱ्या मुलांसाठी काम करण्यासाठी त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी संघटनेसोबत मिळून गरीब आणि गावातील तरुणांसाठी काम करायला सुरुवात केली.

आण्णा हजारेंच्या आंदोलनापासून सुरु झाली चळवळ  

2011 साली दिल्लीमध्ये आण्णा हजारे यांचे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन सुरु होते. त्यावेळी देशभरातील हजारो तरुणांनी या आंदोलनाला पाठींबा दिला होता. स्वाती मालीवाल यापैकी एक होत्या.  त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. यानंतर 2013 मध्ये 'ग्रीनपीस इंडिया' सोबत जोडल्या गेल्या. 

2014 मध्ये त्या आम आदमी पक्षासोबत जोडल्या गेल्या. आंदोलनाच्या काळापासून त्या अरविंद केजरीवाल यांच्यासोबत काम करत होत्या. 

राजकारणात मिळाले यश 

2015 मध्ये स्वाती मालीवाल या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा बनल्या. महिलांच्या मुद्द्यांवर त्या आधीपासूनच काम करत होत्या. यात त्यांना एक मोठी जबाबदारी मिळाली. आता त्या पॉलिसी मेकींगचा भाग बनल्या होत्या. 2024 मध्ये स्वाती मालीवाल या राज्यसभा खासदार म्हणून निवडल्या गेल्या. 

खासगी आयुष्य 

स्वाती मालीवाल यांनी 19 फेब्रुवारी 2020 ला पती जय हिंद यांना घटस्फोट दिला. यासंदर्भात माध्यमांमध्ये चर्चा झाली होती. आपण लग्न टिकवण्याचा खूप प्रयत्न केला पण तसे झाले नाही. पण जे काही झालं त्याचा पश्चाताप नसल्याचेही त्या सांगतात.