पुणे स्पोर्ट्स कार अपघाताचं धक्कादायक CCTV आलं समोर; पाहून अंगावर काटा येईल

 Pune Porsche Car Accident CCTV Footage: पुण्यात पोर्शे कारने (Pune Porsche Car Accident) दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे. आरोपी अल्पवयीन असून कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. दरम्यान ही स्पोर्ट्स कार किती वेगात होती हे दाखवणारं सीसीटीव्ही (CCTV) समोर आलं आहे.   

शिवराज यादव | Updated: May 21, 2024, 11:23 AM IST
पुणे स्पोर्ट्स कार अपघाताचं धक्कादायक CCTV आलं समोर; पाहून अंगावर काटा येईल title=

 Pune Porsche Car Accident CCTV Footage:पुण्यात रविवारी भीषण अपघात झाला असून पोर्शे कारने (Pune Porsche Car Accident) दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे. अपघात इतका भीषण होता की, भरधाव वेगात असणाऱ्या कारने दिलेल्या धडकेनंतर दुचाकीवर असणारे दोघेही हवेत उडाले आणि दुसऱ्या एका कारवर जाऊन पडले. यामुळे दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. एका प्रत्यक्षदर्शीनुसार कार तब्बल 200 किमी वेगात होती. दरम्यान घटनास्थळावरचं एक सीसीटीव्ही समोर आलं असून यामध्ये कार किती वेगात होती हे स्पष्टपणे दिसत आहे. 

पुण्यातील कल्याणी नगर परिसरात एका आलिशान सुपरकारने रात्री अडीच वाजताच्या सुमारास दोघांना उडवलं. हे दोघेही पीडित आपल्या दुचाकीवर होते. धडक इतकी भीषण होती की, दोघे हवेत उडाले आणि दुसऱ्या एका कारवर जाऊन पडले. यानंतर कार रस्त्याच्या शेजारी जाऊन धडकली आणि तिथेच थांबली. यानंतर तिथे उपस्थित नागरिकांनी चालकाला चोप दिला. या अपघाताच्या काही सेकंद आधीचा व्हिडीओ समोर आला आहे. 

सीसीटीव्हीत दिसत आहे त्यानुसार कार अत्यंत वेगात होती. दरम्यान पीडित तरुण, तरुणी स्कुटीवर होते आणि अपघाताच्या काही सेकंद आधी त्यांनी यु-टर्न घेतला होता. यानंतर पाठून वेगाने ही कार जाताना दिसत आहे. सीसीटीव्हीत नेमका अपघात कैद झालेला नाही. पण कार गेल्यानंतर लगेचच लोक तिच्या दिशेने धावत असल्याचंही सीसीटीव्हीत दिसत आहे. 

अल्पवयीन चालक पुण्यातील प्रसिद्ध बिल्डरचा मुलगा आहे. प्राथमिक माहितीनुसार, कार चालवत असताना त्याचं नियंत्रण सुटलं आणि त्याने अनेक गाड्यांना धडक दिली. याच धडकेत अश्विनी कोष्टा आणि अनिस अहुदिया यांना जीव गमवावा लागला आहे. अश्विनी कोष्टा आणि अनिस अहुदिया दोघेही दुचाकीवरुन प्रवास करत होते. पीडितांचा मित्र एकीब रमझान मुल्ला याने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

आरोपीला जामीन मंजूर 

आरोपी अल्पवयीन असून त्याला जामीन मंजूर कऱण्यात आला आहे. कारवाईनंतर अवघ्या 15 तासांतच आरोपीला जामीन मंजूर झाला. आरोपी अल्पवयीन असल्याने कोर्टाकडून जामीन मंजूर झाला झाला असून या प्रकरणी आता आरोपीच्या वडिलांवर कारवाई होणार आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षांच्या आरोपीवर गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला लगेचच ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. जामीन मंजूर करताना कोर्टाने काही अटी शर्थीदेखील ठेवल्या आहेत. कोर्टाने आरोपीला या दुर्घटनेवर निबंध लिहिण्यास सांगितला आहे. तसंच, 15 दिवस येरवडा ट्रॅफिक पोलिसांत स्वेच्छेने काम करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर दारू सोडण्यासाठी मदत करण्यासाठी डॉक्टरांची मदत घेण्यास सांगितले आहे.