Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

 नवी मुंबईसह बेलापूर, ऐरोली या मतदारसंघातील अनेक मतदारांची नावं मतदार यादीतून गायब झाली आहेत. यामुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे .

Updated: May 18, 2024, 07:23 PM IST
Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना title=

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या एकूण 543 जागांसाठी सात टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. आतापर्यंत देशभरातील चार टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. येत्या सोमवारी 20 मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. मतदान दोन दिवसांवर येऊन ठेपले असताना मतदार यादीतील घोळ अद्याप संपलेला नाही. नवी मुंबईसह बेलापूर, ऐरोली या मतदारसंघातील अनेक मतदारांची नावं मतदार यादीतून गायब झाली आहेत. यामुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे .

अनेक मतदारांची नाव गायब

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई मतदारसंघ, उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघ, उत्तर-पूर्व मुंबई मतदारसंघ, उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघ, दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ, दक्षिण मुंबई मतदारसंघ या 13 मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. पण आता मतदार यादीचा घोळ समोर आला आहे. नवी मुंबईमधील ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघात अनेक मतदारांची नाव गायब झाली आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे अनेक मतदारांनी गेल्या निवडणुकीत मतदान केले होते. पण यंदाच्या मतदार यादीत त्यांची नावे गायब असल्याचे समोर आले आहे. ऐरोली सेक्टर आठ मध्ये राहणारे गणेश खेरनार यांचे नावही मतदार यादीतून गायब झाले आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा नव्याने नाव नोंदवावे लागणार आहे.  

काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख

तर कोपरखैराणे विभागात मतदार यादीत अपंग असलेल्या व्यक्तीची संख्या वाढवून दाखवण्यात आली आहे. या यादीत एकाच घरातील सर्व व्यक्ती अपंग असल्याचे दाखवण्यात आले आहेत. यामुळे मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप राजकीय कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. मतदार यादी अपडेट करण्यासाठी अनेक मतदारांचे फोटो नव्हते. त्यामुळे त्यांनी फोटो देण्याचे आवाहन करण्यात आले होते. पण ज्या मतदारांनी फोटो दिले नाहीत, त्यांची नावं गायब झाल्याची माहिती समोर येत आहे.  

दरम्यान येत्या 20 मे रोजी मुंबईतील सहा मतदारसंघात निवडणूक पार पडत आहे. यात उत्तर मुंबई मतदारसंघ, उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघ, उत्तर-पूर्व मुंबई मतदारसंघ, उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघ, दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ, दक्षिण मुंबई मतदारसंघ या सहा मतदारसंघाचा समावेश आहे. मुंबईसोबतच महाराष्ट्रातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे या लोकसभा मतदारसंघातही मतदान पार पडणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाकडून जय्यत तयारीही केली जात आहे.