Maharashtra Weather News : उष्णतेच्या लाटांनी महाराष्ट्र बेजार; कोकण वगळता राज्यातील 'या' भागांना सर्वाधिक फटका

Maharashtra Weather News : राज्यातील तापमानवाढीमुळं अडचणी वाढल्या, कोणत्या भागाला सोसाव्या लागणार उन्हाच्या सर्वाधिक झळा?   

सायली पाटील | Updated: Apr 2, 2024, 07:15 AM IST
Maharashtra Weather News : उष्णतेच्या लाटांनी महाराष्ट्र बेजार; कोकण वगळता राज्यातील 'या' भागांना सर्वाधिक फटका  title=
Maharashtra Weather News Summer heat wave to be contuinued in state

Maharashtra Weather News : अवकाळीचं सावट अधूनमधून डोकावत असतानाच राज्यात उकाडा प्रचंड वाढताना दिसत आहे. राज्याच्या काही भागांमध्ये तापमानाचा आकडा हवामान बदलांमुळं कमीजास्त होताना दिसत असून, सध्या कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्र सूर्याच्या तीव्रतेनं होरपळून निघताना दिसत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. 

सध्याच्या घडीला विदर्भ, कर्नाटकसह तामिळनाडूच्या दक्षिण भागापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. ज्यामुळं दिवसाप्रमाणेच रात्रीच्या वेळीसुद्धा उन्हाच्या झळांची उष्णता दाणवचत आहे. दुपारच्या वेळी तापमानात होणारी लक्षणीय वाढ रात्रीपर्यंत कायम राहत असल्यामुळं ही परिस्थिती उद्भवत असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. याच धर्तीवर धाराशिव, नांदेड, लातूर आणि सोलापूरात उष्ण रात्रीचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र होणार 

हवामान तज्ज्ञ आणि अभ्यासकांच्या अंदाजानुसार यंदाच्या वर्षी कोकण किनारपट्टी वगळता राज्यभरात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार असून उष्णतेच्या झळा वाढण्याची शक्यता आहे.  राज्यात सध्या सुरु असणारा एप्रिल आणि ऐन उन्हाळ्यातला मे महिना अधिक उष्ण राहणार असून, यादरम्यान उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतेक भागांत उष्णतेच्या लाटा येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यातील उष्णतेच्या लाटेचा काळ दोन दिवसांपासून आठ दिवसांपर्यंत असू शकतो. त्यामुळं दैनंदिन कामं आणि सध्या सुरु असणारी निवडणुकांची रणधुमाळी पाहता या काळात विशेष काळजी घेण्याच्या सूचना हवामान विभागानं केल्या आहेत. 

मराठवाड्यातील तापमान वाढणार 

नुकतंच भारतीय हवामान विभागाच्या महासंचालकांनी एप्रिल ते जून या तीन महिन्यांचा हवामानाचा अंदाज जाहीर केला. या अहवालामध्ये देशभरात मार्च महिना अल निनोमुळं सरासरीपेक्षा उष्ण ठरल्याची बाब समोर आली. एप्रिल आणि मे महिन्यांतही तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज असल्याचा इशारा यावेळी हवामान विभागानं देत येत्या काळात मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तापमान सरासरीपेक्षा किमान दोन अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यताही वर्तवली. 

उष्णतेचा पावसावर काय परिणाम? 

सध्या पॅसिफिक महासागरात सक्रीय असणारा अल निनो एप्रिल-मे महिन्यात तुलनेनं कमी तीव्रतेकडे झुकणार असून, पुढं ला-निनाची स्थिती तयार होऊ शकते. असं झाल्यास पूर्वमोसमी पावसासाठी आणि मान्सूनसाठीसुद्धा पोषक वातावरणनिर्मिती तयार होऊ शकते.