कोरोना कार्यालयात घुसणार नाही, स्वयंमचलित टेम्पेचर दरवाजा

कोरोनाचे संकट वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच कार्यालयांच्या दारावर येणाऱ्यांच्या शरीराचे तापमान मोजले जाते.

Updated: Sep 17, 2020, 12:31 PM IST
कोरोना कार्यालयात घुसणार नाही, स्वयंमचलित टेम्पेचर दरवाजा   title=

अमर काणे / नागपूर : कोरोनाचे संकट वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच कार्यालयांच्या दारावर येणाऱ्यांच्या शरीराचे तापमान मोजले जाते. आणि वहीत त्याची नोंदही ठेवली जाते. नागपुरात एका युवा संशोधकाने कार्यालयात येणाऱ्याच्या शरीराचे तापमान सामान्यपेक्षा जास्त असेल तर त्या व्यक्तीला कार्यालयाच्या आत प्रवेशच मिळणार नाही, असे स्वयंचलित यंत्र बनविले आहे. त्यामुळे आधी तापमान मोजल्यानंतरच दरवाजा उघडतो.

युवा संशोधक नाहुष कुलकर्णी याच्या या स्वयंचलित यंत्रणेला नागपूर वाहतूक पोलिसांनी प्रायोगिक तत्वावर त्यांच्या कार्यालयात स्थान दिले आहे. या यंत्रणेत थर्मल थर्मामीटरला सेन्सरच्या मदतीने स्वयंचलित दाराशी जोडण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांच्या कार्यालयात चालान दंड भरायला आलेल्यांना या यंत्रणेवर आधी शरीराचे तापमान मोजावे लागते. ते ३७ डिग्री म्हणजेच ९८.६ फेरेनहिट पेक्षा कमी असेल तरच स्वयंचलित यंत्राच्याद्वारे दरवाजा उघडतो. आणि चालान भरायला आलेल्या व्यक्तीला प्रवेश मिळतो.

मात्र, ज्याच्या शरीराचे तापमान जास्त आहे, त्यांना स्वयंचलित दरवाजा प्रवेश नाकारतो. त्यामुळे सध्या वाहतूक उपायुक्तांच्या कार्यालयात प्रायोगिक तत्वावर लावण्यात आलेली ही यंत्रणा यशस्वी ठरल्यास नागपूर पोलिसांच्या इतर कार्यालयातही बसविली जाणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे डीसीपी विक्रम साळी यांनी ही दिली. शरीराचे तापमान योग्य असेल तरच कार्यालयात प्रवेश देणारी ही यंत्रणा सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.