तुझे फोटो मॉर्फ करून व्हायरल करेन', धमकी देत मैत्रिणीकडूनच उकळले तब्बल 'इतके' लाख रुपये

Nashik : तरुणीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत चाळीस लाख रुपयांची खंडणी (Extortion) मागितल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडल आहे. याप्रकरणी परदेशात असलेल्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Updated: Jan 30, 2024, 05:51 PM IST
तुझे फोटो मॉर्फ करून व्हायरल करेन', धमकी देत मैत्रिणीकडूनच उकळले तब्बल 'इतके' लाख रुपये title=
प्रातिनिधिक फोटो

सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : उच्चशिक्षित तरुणीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत चाळीस लाख रुपयांची खंडणी (Extortion) उकळल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. पिडीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार नाशिकच्या मुंबईनाका पोलीस ठाण्यात सध्या परदेशात असलेल्या संशयित तरुणाविरुद्ध खंडणी आणि विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अशी झाली ओळख 
उच्चशिक्षित पीडित तरुणी आणि संशयित तरुण हे दोघ गोविंदनगर परिसरात असलेल्या एका इंग्रजी माध्यमातील शाळेत शिक्षण घेत होते. यादरम्यान 2007 मध्ये दोघांची ओळख झाली. यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना दोघांमध्ये हि मैत्री कायम राहिली. पिडीत तरुणी कॉम्प्युटर इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असताना मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले.

खासगी फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी 
दोघांची मैत्री कायम असताना संशयित तरुणाने कधी आर्थिक चणचण तर कधी, इतर कारणातून पैसे उकळले.  पण त्याचा पैशांचा हव्यास कमी झाला नाही. आणखी पैसे उकळण्यासाठी त्याने कट रचला. 'तुझे खासगी फोटो मॉर्फ करून व्हायरल करेन', अशी धमकी त्याने मुलीला दिली. तरुणीचा विनयभंग करून तिला ब्लॅकमेल केलं. त्यामुळे पीडितेने भीतीपोटी वेळप्रसंगी कर्ज काढून संशयिताला पैसे दिले. 

मात्र तरुणाची पैश्यांची मागणी कमी होत नव्हती. आरोपी तरुणाने मुलीकडून लाखो रुपये त्याने उकळले. शेवटी मुलीने धीर करुन पोलीस ठाणे गाठलं. पिडीत तरुणीने आपबिती सांगितल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज पत्की यांनी त्वरित गुन्हा नोंदवून उपनिरीक्षक पंकज सोनवणे यांना तपासाचे निर्देश दिले आहेत. 

संशयित परदेशात असल्याचा संशय 
पोलीस पथक गुन्ह्याचा तपास करण्यासाठी संशयित तरुणाच्या घरी गेला असता संशयित तरुणाच्या नातेवाईकांनी तो परदेशात असल्याची माहिती आहे. मात्र संशयित परदेशात नसून इतरत्र असल्याचा संशय पोलिसांना असून याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

मनमाडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ
दरम्यान, मनमाडच्या नागापूरमध्ये धुमाकुळ घालणारे अज्ञात चोरटे सिसिटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाले आहेत. मध्यरात्री नंतरचोरटे गावात दोन दुचाकीसह हातात धारदार शस्त्र घेऊन फिरतांना दिसत असल्याने परिसरात दहशत पसरली आहे.चोरटयानी एक घरफोडी करून जवळपास दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. काही घराचे कडी कोयंडे तोडून चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला.या प्रकरणी मनमाड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. सिसिटीव्ही फुटेजच्या  (CCTV Footage) आधारे पोलीस चोरांचा शोध घेत आहे