गायक सुरेश वाडकर यांच्या भूखंड प्रकरणाला वेगळं वळण, स्वीय सहायकाकडे 20 कोटींची मागितली खंडणी

Nashik : हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या भूखंड प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे. संगीत विद्यालयसाठी नाशिकमधल्या जमिनीसाठी वाडकर यांच्या स्वीय सहाय्यकाकडे 20 कोटींची खंडणी मागण्यात आली आहे. 

Updated: Feb 7, 2024, 08:44 PM IST
गायक सुरेश वाडकर यांच्या भूखंड प्रकरणाला वेगळं वळण, स्वीय सहायकाकडे 20 कोटींची मागितली खंडणी title=

सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांनी नाशिक शहरात संगीत महाविद्यालयासाठी खरेदी केलेल्या भूखंड प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. वाडकर यांचे स्वीय सहायक संबंधित जागेची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना खंडणीची (Extortion) मागणी करण्यात आली असून जिवे ठार मारण्याची धामकीही देण्यात आली आहे.  स्वीय सहायक मुनिराज राजकुमार मीना यांच्या तक्रारीवरुन उपनगर पोलीस ठाण्यात (Nashik Police) याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 काय आहे प्रकरण
संगीताशी नितांत प्रेम असलेले प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी नाशिकमध्ये संगीत महविद्यालय सुरु करण्याचा निर्णय दीड दशकापूर्वी घेतला होता. यासाठी त्यांनी शहरातील नाशिकरोड परिसरात जमीन सुद्धा खरेदी केली. मंगळवारी संध्याकाळी सुरेश वाडकर यांचे स्वीय सहायक मुनिराज राजकुमार मीना जमिनीची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी काही संशयित आरोपींनी  'जमिनीचे प्रकरण आमच्याकडे आल्याचं सांगून, या जमिनीमध्ये न येण्यासाठी दरगोडे बंधूना पंधरा कोटी आणि आमच्या टोळीसाठी पाच कोटी अशी एकूण वीस कोटी रुपयांची मागणी केली'. पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप मुनिराज मीना यांनी केला आहे.  याप्रकरणी दोन संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी सांगितलं.

अजित पवार यांच्या कडे व्यक्त केली होती खंत 
गेल्या महिन्यात सुरेश वाडकर यांचा जीवनगौरव पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी नाशिकमध्ये संगीत महाविद्यालयासाठी जागा खरेदी व्यवहारात कशी फसवणूक झाली याची खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर व्यक्त केली होती. हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी वाडकर यांनी अजित पवार यांच्याकडे केली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संगीत महाविद्यालय आम्ही पूर्ण करू, असं आश्वासन दिलं होतं.