डुकरानं तोडले लचके तोडल्याने रुग्णाचा मृत्यू; नांदेडच्या शासकीय रूग्णालयातील धक्कादायक प्रकार

नांदेडच्या शासकीय रूग्णालयातील डुकरानं रूग्णाचे लचके तोडले आहेत. यात 35  वर्षीय रूग्णाचा मृत्यू झाला आहे. 

Updated: Nov 11, 2023, 10:26 PM IST
डुकरानं तोडले लचके तोडल्याने रुग्णाचा मृत्यू; नांदेडच्या शासकीय रूग्णालयातील धक्कादायक प्रकार title=

Nanded Civil Hospital News : नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयाच्या परिसरात एका रुग्णावर डुकरांन हल्ला करुन त्याच्या शरिराचे लचके तोडले. यात 35 वर्षीय तुकाराम कसबे यांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी देखील नांदेडच्या शासकीय रुग्णालयात रुग्णांसह हलगर्जीपण होत असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. 

तुकाराम कसबेंवर टीबीचे उपचार सुरु होते त्यांना 9 नोव्हेंबरला डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र ते पुन्हा रुग्णालयात दाखल झाले होते. आज पहाटे रुग्णालय परिसरातील झाडीत तुकाराम यांच्या शरिराचे लचके डुक्कर तोडत असताना दिसले. सुरक्षारक्षक येईपर्यंत तुकाराम यांच्या चेह-याचा आणि मांडीच्या भागाचे डुक्करांनी लचके तोडले होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. गेल्या महिन्यात याच रुग्णालयात 24 तासात 24 मृत्यू झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं. आता रुग्णालय परिसरातल्या या घटनेनं खळबळ माजली आहे.  

रुग्णालयाबाहेर अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाचे लचके डुकराने तोडले 

एका अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाचे डुकरं लचके तोडत असल्याच्या धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला होता.  नांदेडमधील विष्णुपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बाहेरील ही धक्कादायक घटना आहे. विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयाच्या बाहेरील मुख्य रस्त्यालगत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पडलेला होता.  या मृतदेहाला डुकरं खात असल्याचा प्रकार काही नागरिकांच्या निदर्शनास आला. डुकाराना नागरिकांनी हाकलून लावलं. पण तोपर्यंत डुकरानी अर्धाधिक मृतदेह खाल्ला होता. विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात अनेक गंभीर रुग्ण, मनोरुग्न, भिकारी पडून असतात. त्यापैकी एखाद्या व्यक्तीचा हा मृतदेह असल्याचा अंदाज आहे. दरम्यान शासकीय रुग्णालयाबाहेर हा प्रकार घडल्याने नागरिकातुन संताप व्यक्त केला जात होता.  आता तेथे रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाचेच लचके डुकरानं तोडले आहेत. 

नांदेडच्या शासकीय रुग्णालायत 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू 

महिनाभरापूर्वीच नांदेडच्या शासकीय रुग्णालायत 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती.  मृत्यू झालेल्यांमध्ये पोषणाची समस्या असलेली नवजात बालकं आणि उपचारांना प्रतिसाद देऊ शकत नसलेले 75 ते 80 वयोगटातील रुग्णांचा समावेश होता. नांदेडच्या घटनेचा आरोग्य विभागाशी काहीही संबंध नाही नांदेड रुग्णालय आरोग्य विभागाच्या आखत्यावरीय येत नसल्याचा दावा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला होता. 24 जणांच्या मृत्यू कोणीच दोषी नाही असे म्हणत चौकशी समितीकडून नांदेड जिल्हा रुग्णालयाला क्लीनचिट देण्यात आली.