पहिल्यांदाच विमानाने मजुरांची घरवापसी, १७४ प्रवासी मुंबईतून रांचीला रवाना

कोरोनाचे संकट आणि लांबलेले लॉकडाऊन यामुळे अनेकांचे हाल सुरु झालेत.

सुरेंद्र गांगण | Updated: May 29, 2020, 12:01 PM IST
पहिल्यांदाच विमानाने मजुरांची घरवापसी, १७४ प्रवासी मुंबईतून रांचीला रवाना title=

मुंबई : कोरोनाचे संकट आणि लांबलेले लॉकडाऊन यामुळे अनेकांचे हाल सुरु झालेत. काही परप्रांतीय मजूर आपल्या गावी जाण्यासाठी पायी तसेच मिळेल ते वाहन पकडताना दिसून येत होते. त्यामुळे त्यांच्यासाठी राज्य सरकारने एसटी आणि रेल्वेची व्यवस्था करण्यात आली. आता तर पहिल्यांदाच मजूर आपल्या राज्यात विमानाने पोहोचले आहेत. यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत विमान उपलब्ध करुन दिले. दरम्यान, त्याआधी १ मे रोजी झारखंडच्या स्थलांतरितांना विशेष श्रमिक रेल्वेद्वारे प्रथम तेलंगणाहून रांची येथे पाठवले गेले होते. तर आता गुरुवारी मुंबईहून रांची येथे विमानाने प्रवास करणाऱ्या १७४ मजुरांची पहिलीच विमानवारी ठरली आहे.

बंगळुरुच्या नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी (एनएलएसआययू) च्या माजी विद्यार्थ्यांनी एअर एशिया विमान भाड्याने उपलब्ध करुन दिले. या विमानातून १७४ कामगार झारखंडमध्ये रवाना करण्यात आले. दीर्घ लॉकडाऊन दरम्यान मुंबईत अडकलेल्या मजुरांना हे विमान भाड्याने उलब्ध करुन दिले आहेत. लॉकडाऊन दरम्यान खासगी व्यक्तींच्या ग्रुपने चार्टर्ड विमान भाड्याने देण्यासाठी आणि अडकलेल्या परप्रवासी कामगारांना वाचवण्यासाठी निधी जमविण्याची ही पहिली घटना आहे. 

गुरुवारी मुंबई विमानतळावरुन परप्रांतीय मजुराना घेऊन याविमानाने सकाळी सहा वाजता उड्डाण केले आणि सकाळी ८.५० वाजता हे विमान रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळावर पोहोचले. विमानात बसल्यानंतर ते रांची येथे उतरल्यानंतर मजुरांच्या चेहऱ्यावर मोठे समाधान दिसून आले.

 वकील आणि या उपक्रमाचे कोअर टीम सदस्य एनएलएसआययूचे माजी विद्यार्थी सुहान मुखर्जी यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्यांना मदत करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला होता. त्यासाठी  माजी विद्यार्थ्यांकडून सुमारे ११ लाख रुपये जमा केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक मजूरांना त्रास सहन करावा लागत आहे. काही मजुरांनी तर गेल्या काही दिवसांपासून पायी, बस ने आपल्या घरी जाण्यास सुरुवात केली. मात्र, आता पहिल्यांदा हे मजूर विमानाने आपल्या गावी परतत आहेत, याचे समाधान आहे, असे ते म्हणालेत.

मुंबईतून १७४ मजूरांना घेऊन विमान रांचीला रवाना झाले. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मजुरांना विमानतळापर्यंत पोहोचवण्यात आले.  मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहाटे दोन वाजता काही परप्रांतीयमजुरांची रांग लागली होती. हे मजूर सकाळी सहा वाजताच एअर एशियाच्या विमानाने प्रवास करण्यासाठी विमानतळावर उपस्थित होते. बंगळुरु येथील एनएलएसआययू असोसिएशनच्या प्रियंका रमन या प्रत्येक मजूर विमानतळावर पोहोचलेत आहेत, ना याची खात्री करुन घेत होत्या. झारखंडमधील बऱ्याच प्रवाशांना रांची  येथे जायचे होते. याची माहिती मिळाली. त्यानंतर  एनएलएसआययूने त्यासाठी प्रयत्न केला आणि त्यांना परत त्यांच्या गावी पाठवण्याचा निर्णय झाला, त्यांच्याकडून सांगण्यात आले.

दरम्यान, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी अडकलेल्यांसाठी विमान उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभार मानले आहे. झारखंडमधील मजूर विमानाने परत आपल्या राज्यात येत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. अंदमानात अडकलेल्यांना आणण्यासाठी लवकरच आणखी दोन विमाने रांची येथे उतरतील, असे सांगत ते म्हणाले, राज्य सरकार विमानाचे भाडे देईल.