नाईलाजानं उचलावं लागलं पाऊल... जाणून घ्या किती शिकलेयत महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री Eknath Shinde

मुख्यमंत्री शिंदे यांनी बालपणापासून बऱ्याच अडचणींचा सामना केला.   

Updated: Jul 1, 2022, 02:59 PM IST
नाईलाजानं उचलावं लागलं पाऊल... जाणून घ्या किती शिकलेयत महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री Eknath Shinde  title=
Shivsena CM Eknath Shinde Education political career

Maharashtra CM: महाराष्ट्र (Maharashtra) राज्याच्या राजकारणात गेल्या दहा दिवसांपासून वादळं येताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या या राजकीय वादळांची दखल थेट दिल्ली दरबारीही घेतली जात आहे. शिवसेनेशी बंडखोरी करत बाहेर पडलेल्या आमदारांचे नेते, एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं. (Shivsena CM Eknath Shinde Education political career ) 

हे आव्हान अनेकांनाच धक्का देणारं होतं. ज्यानंतर बरेच राजकीय आरोप प्रत्यारोप आणि हेवेदावे झाल्यानंतर अखेर भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी एका संयुक्त पत्रताक परिषदेत राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. 

घोषणा केल्यानंतर काही तासांतच एकनाथ शिंदे यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेत मुख्यमंत्रीपदाचा पदभार सांभाळला. 9 फेब्रुवारी 1964 ला त्यांचा जन्म झाला होता. एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी बालपणापासून बऱ्याच अडचणींचा सामना केला. 

उपलब्ध माहितीनुसार मुख्यमंत्र्यांचं प्राथमिक शिक्षण मंगला हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये झालं. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळं त्यांनी कसंबसं माध्यमिक शिक्षण पूर्ण करत 11 वी पर्यंतचं शिक्षण घेतलं. पण, कुटुंबाच्या जबाबदारीखातर नाईलाजानं त्यांना शिक्षण अर्ध्यावरच सोडावं लागलं. 

अर्थार्जनासाठी त्यांनी कमी वयातच काम करण्यास सुरुवात केली. काळ पुढे गेला आणि त्यानंतर ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांच्या संपर्कात आले आणि तिथून त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. 

शिक्षण अर्ध्यावर सोडल्याची खंत त्यांच्या मनात कायम होती. 2014 मध्ये महाराष्ट्रात भाजप- शिवसेनेचं सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे यांना मंत्रीपद देण्यात आलं. ज्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा शिक्षणाच्या दिशेनं मोर्चा वळवला. 

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून त्यांनी मराठी आणि राजकारणाशी संबंधीत विषयांमध्ये बीएपर्यंतचं शिक्षण घेत, पदवी ग्रहण केली. वयाच्या 58 व्या वर्षी एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आणि तळागाळातला माणूस प्रशासकीय सत्तेवर जाऊन बसल्याचा आनंद त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला.