'भाजपला आता संघाची गरज नाही, आम्ही सक्षम' जे पी नड्डा यांच्या वक्तव्याने राजकारण पेटलं

JP Nadda on RSS : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डांनी RSSबद्दल केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होतीय. ऐन निवडणुकीच्या मध्यातच नड्डा यांनी हे वक्तव्य केलंय. भाजपला आता संघाची गरज नसल्याचं वक्तव्य जे.पी.नड्डांनी केलंय. त्यामुळे नड्डांच्या वक्तव्यावरून नवा वाद पेटलाय. 

राजीव कासले | Updated: May 18, 2024, 05:29 PM IST
'भाजपला आता संघाची गरज नाही, आम्ही सक्षम' जे पी नड्डा यांच्या वक्तव्याने राजकारण पेटलं title=

JP Nadda on RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे भाजपची मातृसंस्था आणि राजकीय आघाडी.  मात्र याच संघाबाबत भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी केलेल्या विधानावरुन नवा वाद पेटलाय. भाजप आता स्वत:च पक्ष चालवू शकतो, क्षमता कमी असताना संघाची गरज होती, असं विधान जेपी नड्डांनी (J P Nadda) केलंय. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या या वक्तव्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात. नड्डांच्या या विधानाने विरोधकांना आयतं कोलीतच मिळालंय. मोदी-शाहांचा संघाला संपवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधलाय. 

जेपी नड्डा यांनी नेमकं काय म्हटलं
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत जेपी नड्डा यांनी भाजप-आरएसएसवर मत मांडल. ' अटलबिहारी वाजपेयींच्या काळात भाजपाला स्वतःला चालवण्यासाठी आरएसएसची गरज होती, कारण त्यावेळी भाजप कमी सक्षम आणि लहान पक्ष होता.  सुरुवातीला आमची ताकद कमी होती. मात्र, आता पक्षाची ताकद वाढली आहे. पूर्वीपेक्षा आम्ही आता अधिक सक्षम झालो आहोत. भाजप आता संपूर्ण पक्ष स्वतः चालवतो.  पक्षाचे नेते त्यांची कर्तव्ये आणि भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत असं नड्डा यांनी म्हटलं.

विरोधकांचा भाजपवर निशाणा
शिवसेनेला (Shivsena) नकली म्हणणारे उद्या राष्ट्रीय स्वंयसेवक संघालाही (RSS) नकली म्हणतील हे मी व्यक्त केलेले भाकित भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मुलाखतीवरून स्पष्टच झालं आहे. कारण नड्डा यांनीही संघाची उपयुक्तता संपल्याचे विधान केल्याचं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटलंय. मला आरएसएससाठी भीती वाटायला लागली आहे. भाजपा आता संघावरही बंदी आणेल असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. तर ज्या शिडीचा आधार घेऊन मोठे झालेत त्याच शिडीला आज सोडण्याची तयारी भाजपनं केल्याची टीका वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी केलीय.

भाजपमागे संघाची विचारधारा
भाजप सत्तेवर असताना जी धोरणं राबवली जातात, त्यामागे संघाचीच विचारधारा असल्याचं मानलं जातं. आजवर जमिनीवर राहून भाजपसाठी जमीन सुपीक करण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलंय.  अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांचं नेतृत्व प्रबळ होतं तेव्हा भाजपनं संघाला फारसं जुमानलं नव्हतं हासुद्धा इतिहास आहे. 2014 आणि 2019 मध्ये मोदी सरकार बहुमताने सत्तेत आलं. त्यानंतरच्या काळात मोदी-शाहांनी संघाला बाजूला सारल्याचे आरोपही झाले.. 

देशभरात लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली असतानाच नड्डा यांनी हे विधान केलंय. नड्डा यांच्या या वक्तव्यानंतर आता संघाची नेमकी भूमिका काय असणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.